Apple चं लक्ष पुण्याकडे!दोन मोठ्या उत्पादनांची निर्मिती भारतात होणार?
Apple ने येत्या काही वर्षात भारतात लॅपटॉप आणि डेस्कटॉपचे उत्पादन करावे अशी सरकारची इच्छा आहे. अधिकाऱ्याने सांगितले की Apple ने भारतात पुढील 2-3 वर्षांत राबवता येतील अशा काही ‘मोठ्या योजना’ सरकारसह शेअर केल्या आहेत.
बलाढ्य कंपन्यांनी भारतात उत्पादन केंद्र निर्माण करावे यासाठी केंद्र सरकारने आखलेल्या योजनांचे फळ म्हणून येत्या काही महिन्यांमध्ये Apple कंपनी भारतात iPads ची निर्मिती पुन्हा सुरु करण्याच्या तयारीत असल्याचे समजतेय. याविषयी मनीकंट्रोलने कंपीनीतील सूत्रांच्या (नाव न सांगण्याच्या विनंतीवर) हवाल्याने वृत्त दिले आहे. मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार, यापूर्वी Apple ने चीनच्या BYD सह भागीदारी करून भारतात आयपॅड्सच्या निर्मितीचा प्रयत्न केला होता मात्र चीन व भारतामधील राजकीय तणावाच्या स्थितीमुळे केंद्र सरकारने यावर निर्बंध लादले होते. हा प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे Apple आता भारतातच उत्पादनासाठी पार्टनर शोधण्याची प्रक्रिया सुरू करण्याची शक्यता आहे.
एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर मनीकंट्रोलला सांगितले आहे की, “BYD भारतात आयपॅड उत्पादनाचा कारखाना सुरू करण्यासाठी तयार होते परंतु मंजुरीची समस्या होती आणि आता परिस्थिती बदलली आहे. आम्ही आता Apple ला पुढील दोन-तीन वर्षांत भारतात अधिक प्रगती करता येईल या उद्देशाने मदत करत आहोत. त्यामुळे उत्पादनात सुद्धा लक्षणीय वाढ होईल.”