महसूल कर्मचाऱ्यांचे उद्यापासून काम बंद आंदोलन; सर्व संघटनांचा सहभाग
महसूल विभागात ४० टक्के पदे रिक्त आहेत. लोकसंख्येनुसार नवीन आकृतीबंध तयार करावा यासह आदी मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. सोमवारपासून (ता.१५) बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे.
महसूल कर्मचारी संघटनेने वेळोवेळी राज्य शासनाला निवेदने देऊन महसूल विभागातील रिक्तपदे भरावेत, लोकसंख्येनुसार नवीन आकृतीबंध तयार करावा, पदोन्नती, पदाचे नामांतरण, वैद्यकीय बिले आदी मागण्यांकडे लक्ष वेधले होते. या मागण्यांची पूर्तता न झाल्याने आंदोलनास सुरूवात केली आहे. काळ्या फिती लावून बुधवारी (ता.१०) आंदोलन करण्यात आले. दुसऱ्या दिवशी निदर्शने करण्यात आले. शुक्रवारी (ता.१२) लेखणी बंद आंदोलन करण्यात आले.
‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण’ या योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. उत्पन्न, रहिवासी दाखले महसूल विभागाकडून दिले जात आहेत. त्यामुळे लाडकी बहिण ही अडचणीत येणार आहे.
महसूल विभागाचा सुधारीत आकृतीबंध दांगट समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कपात न करता लागू करावा, अव्वल कारकून, मंडल अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार या पदावर पद्दोन्नती द्यावी. सुधारीत नविन आकृतीबंधानुसार पुरवठा विभागातील लिपीक-टंकलेखक व अव्वल कारकून, पुरवठा निरीक्षक यांची पदे सरळसेवेतून भरली जातात. या पदांचा सरळसेवा परीक्षेचा निकाल लागलेला आहे. महसूल विभागातील अव्वल कारकून कर्मचारी हे पुरवठा विभागात कार्यरत असलेल्या कर्मचारी यांना मूळ महसूल विभागात सामावून घेण्यासाठी राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यात जागा या रिक्त नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महसुल विभागाचा आकृतीबंद तत्काळ मंजूर केल्यास सदर कर्मचारी यांना महसूल विभागात सामावून घेणे सुलभ होईल.
वैद्यकिय देयके २ ते ३ वर्षांपासून प्रलंबित आहेत. ते तात्काळ द्यावेत. महसूल सहायक व तलाठी ही यांचा ग्रेडपे वाढवावा. सेवा नियमित होण्यासाठी महसूल सहायक व तलाठी यांना विभागीय दुय्यम सेवा परीक्षा व पदोन्नतीसाठी महसूल अहर्ता परीक्षा अशा दोन परीक्षा देणे आवश्यक आहे. राज्य शासनाच्या इतर कोणत्याही विभागात दोन परीक्षा पद्धती नाही. काही विभागात तर परीक्षा पद्धतीच नाही. त्यामुळे महसूल विभागात देखील एकच परीक्षा पद्धत करण्यात यावी, यासह इतर मागण्या केल्या आहेत.