राज्यातील पात्र महिलांना 46 हजार कोटी रुपये सरकार उपलब्ध करुन देणार : अजित पवार
Government Scheme: राज्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी तसेच जनतेच्या कल्याणासाठी महायुती सरकार कटिबध्द असून समाजातील सर्वच घटकांना पुरेसा न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. अर्थसंकल्पातून जनसन्मानाचीच भूमिका राज्य सरकारने घेतली असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बारामतीत आज (रविवार) आयोजित जनसन्मान मेळाव्यात अजित पवार बोलत होते. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल व सुनेत्रा पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, अनिल पाटील, धर्मराव अत्राम, संजय बनसोडे, रामराजे नाईक निंबाळकर, रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक आमदार व पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, अर्थसंकल्पात मांडलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यान्वित केलेली असून या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना 46 हजार कोटी रुपये राज्य सरकार उपलब्ध करुन देणार आहे. महिलांसह शेतकरी, विद्यार्थी, वारकरी, दुर्बल घटकांसाठीही अर्थसंकल्पात सरकारने काही तरी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पायाभूत सुविधा निर्मितीसह अन्य क्षेत्रातील महत्त्वाच्या योजनांना गती दिली जाणार आहे. उसाची एमएसपी (किमान विक्री किंमत) वाढविण्याबाबत केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांना विनंती केली असून त्यांना उद्याच लेखी निवेदन देणार आहे. कांदा आयात केलेला नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
”चुकीच्या नरेटिव्हला बळी पडू नका..”
लोकसभा निवडणुकीच्या वेळेस चुकीचा नरेटिव्ह पसरविण्याचा प्रयत्न केला. विधानसभेला मात्र अशा चुकीच्या नरेटिव्हला बळी पडू नका, असेही आवाहन अजित पवार यांनी केले. राज्य सरकार ग्राहकांचे हित जोपासण्यासोबतच शेतक-यांच्या मालालाही योग्य भाव मिळायला हवा याची काळजी घेत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. भावनिक होऊ नका, प्रश्न सोडविण्यासाठी विकासाच ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी लागते, असेही त्यांनी नमूद केले.